साकळीत श्रद्धा,भक्ती व एकतेचा आणि जातीय सलोख्याचा महोत्सव. हजरत कुतुब सजनशाह वली (रहे.) यांच्या ७६१ व्या ऐतिहासिक उर्स सोहळ्यास दिमाखदार प्रारंभ. आज संदल, उद्या दिल्ली–कानपूरच्या नामवंत कव्वालांची जुगलबंदी

यावल दि.१४
हिंदू–मुस्लिम ऐक्याचे, जातीय सलोख्याचे जिवंत प्रतीक आणि शेकडो वर्षांची उज्ज्वल परंपरा जपणाऱ्या यावल तालुक्यातील साकळी येथील हजरत कुतुब सजनशाह वली ( रहेमतुल्लाअलै ) यांच्या ७६१ व्या उर्स सोहळ्यास सोमवार दि.१५ डिसेंबर रोजी भक्तिमय वातावरणात प्रारंभ होत आहे.सालाबादप्रमाणे आज बाबांच्या संदल निमित्ताने वाजत–गाजत भव्य मिरवणूक काढण्यात येणार असून,या पवित्र सोहळ्यासाठी जिल्ह्यासह महाराष्ट्रा बाहेरून गुजरात व मध्यप्रदेशातून हजारो भाविक साकळीत दाखल झाले आहेत.हा उर्स सोहळा म्हणजे केवळ धार्मिक उत्सव नसून साकळी ग्रामस्थांचा सामाजिक सलोख्याचा,सांस्कृतिक वारशाचा आणि हिंदू–मुस्लिम एकतेचा गौरवशाली उत्सव आहे.
गावातील प्रत्येक नागरिक या उर्सला आपला उत्सव मानून परंपरा जपत आहे. आजही सैय्यद मिरा यांच्या वंशपरंपरेनुसार सैय्यद अहमद ( मेंबर ) यांच्या घरून बाबांच्या पवित्र मझारवर चादर अर्पण केली जाते.

ऐतिहासिक दर्गा – स्थापत्य कलेचा अनोखा नमुना आहे हजरत कुतुब सजनशाह वली (रहे.) यांचे मूळ नाव शाह अ. लतीफ (रहे.) असून, ते ख्वाजा गरीब नवाज अजमेरी (रहे.) यांचे सहकारी म्हणून ओळखले जातात. शेकडो वर्षांपूर्वी साकळीत आलेल्या बाबांचा दगडी बांधकामाचा दर्गा चारही बाजूंनी सारखाच दिसणारा, अतिशय आकर्षक व ऐतिहासिक आहे.या दर्ग्याला दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची श्रद्धा आहे की येथे मनोभावे केलेली प्रार्थना नक्कीच फळाला येते.

आम लंगर ( महाप्रसाद )
संदल निमित्ताने आज सोमवार, दि. १५ रोजी कय्युमशाह बाबा व त्यांच्या सहकाऱ्यांच्या तसेच गावकऱ्यांच्या संयुक्त विद्यमाने दर्गा परिसरात भव्य आम लंगर ( महाप्रसाद ) आयोजित करण्यात आला आहे. हजारो भाविक या महाप्रसादाचा लाभ घेणार आहेत.

 कव्वालीचा जोरदार सामना !
उर्स सोहळ्याच्या दुसऱ्या दिवशी, मंगळवार दि.१६ डिसेंबर रोजी दर्ग्यासमोर भव्य कव्वाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.या कव्वाली कार्यक्रमाचे आयोजन माजी उपसरपंच वसीम खान हाजी आसिफ खान व माजी ग्रामपंचायत सदस्य सैय्यद अशफाक शौकत तसेच त्यांच्या सहकाऱ्यांनी केले आहे. या कव्वालीच्या रंगतदार जुगलबंदीत सुप्रसिद्ध कव्वाल नौशाद अली खान ( दिल्ली ) आणि शिबा परवीन (कानपूर) आमनेसामने येणार असून, भक्ती, सूफी संगीत आणि ताल–सुरांची अविस्मरणीय मैफल रसिकांना अनुभवता येणार आहे.

पाच रविवारांची यात्रा – भक्तीचा अखंड प्रवाह संदल सोहळ्यानंतर सलग पाच रविवार साकळीत यात्रा भरते.या कालावधीत दर्गा परिसरात पाच बाजार भरविले जात असून यामुळे सर्वत्र उत्साहाचे व धार्मिक वातावरण निर्माण होते. दरवर्षीप्रमाणे यंदाही हजारो भाविक दर्शनासाठी येणार आहेत.

सर्वधर्मीय श्रद्धेचे केंद्र
हजरत कुतुब सजनशाह वली (रहेमतुल्लाअलै) हे केवळ मुस्लिम समाजाचेच नव्हे,तर सर्व हिंदू–मुस्लिम बांधवांचे श्रद्धास्थान आहेत.सध्या दर्ग्याची मुजावरीची जबाबदारी सैय्यद अरमान बाबा, सैय्यद निसार बाबा आणि कबीर बाबा तडवी हे निष्ठेने पार पाडत असून,त्यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व धार्मिक विधी शिस्तबद्धरीत्या पार पडत आहेत.श्रद्धा,संस्कृती आणि एकतेचा जिवंत संगम साकळी येथे सुरू असलेला हा संदल,कव्वाली आणि यात्रा उत्सव म्हणजे श्रद्धा, भक्ती,सूफी परंपरा आणि सामाजिक एकतेचा जिवंत संगम ठरत आहे.भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या पवित्र उर्स सोहळ्याचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

0/Post a Comment/Comments

Advertisement

 


 



जाहिरात