एक सिद्ध हस्त व प्रतिभावंत लेखक - मधुकर केचे.

यावल दि.२० 
सुरुवातीच्या काळापासून मधुकर केचे ललित गद्य लेखन करणारे खूप महत्त्वाचे व प्रसिद्ध लेखक होते. 

केचे हे विदर्भातील असल्यामुळे त्यांचे वैदर्भीय संस्कृतीशी जवळचे नाते होते.त्यामुळे अत्यंत सूक्ष्मपणे टिपलेले आजूबाजूचे निसर्गाचे व्यक्तींचे प्रेमळ भाव गद्य लेखनातून साकार झाले आहेत.
ललित लेखन म्हणजे काय? गुजगोष्टी लघुनिबंध,
ललित निबंध या नावांनी ओळखल्या जाणाऱ्या वाङ् मय प्रकाराला ललित गद्य असे नाव मिळाले आहे.
यात प्रवास वर्णन,व्यक्तिचित्रे,आठवणी,अनुभव कथन,भाव किंवा विचारांची लालित्यपूर्ण भाषेत केलेली अभिव्यक्ती अशा विविध प्रकारांचा समावेश करण्यात येतो.

आजच्या लेखात आपण मधुकर केचे लिखित,
पालखीच्या संगे,आखर आंगण,वेगळे कुटुंब,झोपलेले गाव या ललित गद्य लेखनाविषयी थोडक्यात जाणून घेऊ. 

पालखीच्या संगे हा मधुकर केचे यांचा पहिला लेख १९६५ ला प्रकाशित झाला असून यात एकूण १८ लेखांचा समावेश करण्यात आलेला आहे.या संग्रहातील पालखीच्या संगे,चालता बाटुली व वारी हे प्रवासात्मक लेख चौदा महिन्यांनी,गावरात,माझी अमरावती,पुसद अधिवेशन,हे स्थळ वर्णनात्मक लेख आहेत.इलेक्शन , ते वर्ष,ते हि नो दिवसा,निसटलेले क्षण,यामधून लेखकाच्या बालपणापासून तर महाविद्यालयीन जिवनापर्यंतचा प्रवास आलेलाआहे.
पाणी,चेहरे,निर्गुण निराकार, दुर्गमती’ हे प्रासंगिक चिंतनात्मक लेख आहेत. तर डॉ.पंजाबराव देशमुख हा व्यक्तीचित्रणात्मक लेख सुद्धा यात आहे.अशा समिश्र वाड्मय प्रकारातील लेखांची एकत्र गुंफण करून हा लेख संग्रह उत्तम रीत्या केचेनी साकार केला आहे.

आखर अंगण मधुकर केचे यांनी सन१९६२,१९६३, आणि १९६४ या तीन वर्षांमध्ये किर्लोस्कर,
शब्दरंजन,महाराष्ट्र टाईम्स,साधना, वसुधा,नवे जग व दिपावली या नियतकालिकांमधून लेखन केले व त्या प्रकाशित लेखनां एकत्र गुंफून आखर आंगण हे ललित लेखांचे पुस्तक साकार केले.या ललित
लेख संग्रहा मधून कलेचे ह्यांनी स्वतःच्या आयुष्यातील आठवणी व अनुभव रेखांकित केलेले आहेत.

‘वेगळे कुटुंब’केचे यांनी वेगळे कुटुंब मध्ये एकूण बारा व्यक्ती चित्रे रेखाटली आहेत.१९६१ ते १९६४ या तीन वर्षांमध्ये वेगवेगळ्या अंकांमधून प्रकाशित झालेल्या व्यक्ती चित्रांच्या लेखांना एकत्र गुंफून ‘वेगळे कुटुंब’ ही व्यक्तिचित्रणांची लेखमाला निर्माण झालेली आहे.विदर्भातील कर्तृत्व संपन्न व्यक्तिचित्रे लेखकाने रेखाटली आहेत.या सर्व वास्तवातील व्यक्तीं नेमकेपणाने टिपलेल्या आहेत.

झोपलेले गाव हे पुस्तक स्थळ वर्णन आहे.यात प्रवास हा गौण असून विदर्भातील अमरावती जिल्ह्यातील वरुड हे स्थळ केंद्रीभूत आहे. यातील लेखकाचा प्रवास हा केवळ अमरावती वरून वरुड पर्यंतचा आहे.त्या स्थळ वर्णनासाठीच त्या प्रवासाचे प्रयोजन आहे.या स्थळ चित्रणामध्ये निसर्ग प्रतिमा,व्यक्ती प्रतिमा प्रदेश विषयक प्रतिमा आणि इतर काही प्रतिमा यात आलेल्या आहेत त्यांनी वापरलेल्या प्रतिमा त्यांच्या कवि मनांची साथ देणाऱ्या आहेत.व सर्व प्रतिमांवरुन कलेचे एक सिद्ध हस्त व प्रतिभावान लेखक असल्याची प्रचिती येते.

मधुकर केचे यांचे ललित लेख एक उत्कृष्ट लेखनाचा नमुना ठरावे असे आहेत.केचे हे वऱ्हाडी असल्याने वऱ्हाडी भाषेचे प्रतिबिंब त्यांच्या या लेखनात पडलेले आहेत.केचे यांचा वऱ्हाडी मनाचा मोकळेपणा जिभेवरील परखडपणा आणि भक्ती भावनेत रंगलेला श्रद्धाळूपणा याचा प्रत्यय त्यांच्या लेखनातून वाचकास हमखास येतो.

नाव:- प्रा. रामेश्वर वसंत निंबाळकर 
पद:- सहाय्यक प्राध्यापक 
मोबाईल नंबर:- 9689347220
पत्ता:- मु पो.तालुका मलकापूर जिल्हा बुलढाणा.

1/Post a Comment/Comments

टिप्पणी पोस्ट करा

Advertisement

 


 



जाहिरात