पोदार इंटरनॅशनल स्कूल, अकलूद येथे भक्तिमय वातावरणात श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्साहात साजरी


यावल दि. ४ 
“गोविंदा आला रे आला…”या उत्साहपूर्ण वातावरणात यावल तालुक्यातील अकलूद येथील पोदार इंटरनॅशनल स्कूल मधे *भगवान श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उत्सव मोठ्या उत्साहात,आनंदात आणि भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला.

जन्माष्टमीच्या निमित्ताने शाळेतील चिमुकल्या विद्यार्थ्यांनी आपल्या निरागस अभिनयातून श्रीकृष्णाच्या बाललीलांना जिवंत केले. इयत्ता १ ली व २ रीच्या विद्यार्थ्यांनी राधा-कृष्णाची आकर्षक वेशभूषा परिधान करून उत्सवात सहभाग घेतला. नटखट कान्हा आणि राधेच्या मनमोहक रूपामुळे शाळेचा परिसर जणू गोकुळनगरीच झाला.

कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण ठरले ते इयत्ता ६ वीच्या विद्यार्थ्यांचे ‘गोवर्धन लीला’ या विषयावरील नृत्य व नाट्य सादरीकरण. विद्यार्थ्यांनी आपल्या प्रभावी अभिनय, नृत्य आणि संवादातून भगवान श्रीकृष्णाने गोवर्धन पर्वत उचलून गोकुळवासीयांचे रक्षण केल्याची पौराणिक कथा अत्यंत सुंदर पद्धतीने सादर केली. या सादरीकरणाला उपस्थितांकडून उत्स्फूर्त दाद मिळाली.

यानंतर चिमुकल्या गोपाळांनी दहीहंडी फोडत जन्माष्टमीच्या उत्सवात आनंदाची आणि उत्साहाची भर घातली. ‘गोविंदा आला रे !’च्या जयघोषाने संपूर्ण वातावरण दुमदुमून गेले.

या प्रसंगी शाळेचे आदरणीय प्राचार्य  सचिन बनसोडे सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. आपल्या भाषणातून त्यांनी भगवान श्रीकृष्णाच्या जीवनातील प्रेम,मैत्री,धैर्य, कर्तव्यनिष्ठा,सत्य आणि सदाचार या मूल्यांचे महत्त्व स्पष्ट केले. श्रीकृष्णाच्या शिकवणीतून प्रेरणा घेऊन विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनात सकारात्मक मूल्ये रुजवावीत,असा संदेश त्यांनी दिला.

विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग, मनमोहक वेशभूषा, नृत्य-नाट्य सादरीकरण आणि दहीहंडीचा रोमांच यामुळे *श्रीकृष्ण जन्माष्टमीचा हा उत्सव आनंद, उत्साह आणि भक्तिभावाने अविस्मरणीय ठरला.* असे दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात स्कूलचे प्राचार्य नमूद केले आहे.

0/Post a Comment/Comments

Advertisement

 


 



जाहिरात