किनगाव-जळगाव रस्त्यावर विनापरवाना लाकूड वाहतूक करणारे वाहन जप्त ; गस्ती पथकाची कारवाई.

​यावल दि.१७ 
किनगाव–जळगाव रस्त्यावर विनापरवाना जळाऊ पंचराज लाकडाची बेकायदेशीर वाहतूक करणारे टाटा ७०९ वाहन यावल वन विभागाच्या गस्ती पथकाने कारवाई करत जप्त केले आहे.

​मिळालेल्या गुप्त बातमीच्या आधारे गुरुवारी दि. १७ सप्टेंबर २०२६ सायंकाळी सुमारे ४:३० वाजता किनगाव-जळगाव रस्त्यावरील कोळन्हावी चौफुली येथे वन विभागाच्या गस्ती पथकाने संशयास्पद वाहनांची तपासणी सुरू केली होती. यादरम्यान टाटा कंपनीचे ७०९ वाहन (क्रमांक MH-18-D-7454) येताना दिसले. वन कर्मचाऱ्यांनी वाहन थांबवण्याचा इशारा केला असता, चालकाने वाहन घटनास्थळी सोडून लगतच्या केळीच्या बागेत पळ काढला. वन कर्मचाऱ्यांनी त्याचा शोध घेतला, मात्र तो सापडू शकला नाही.​त्यानंतर पंचांच्या समक्ष वाहनाची तपासणी केली असता, त्यात सुमारे १३.०० घनमीटर बेकायदेशीर जळाऊ पंचराज लाकूड आढळून आले. या लाकूड वाहतुकीबाबत कोणताही वैध परवाना किंवा कागदपत्रे उपलब्ध नव्हती. वन विभागाच्या पथकाने लाकडासह टाटा ७०९ वाहन जप्त करून पुढील कायदेशीर कारवाईसाठी मुख्य विक्री केंद्र, यावल येथे जमा केले आहे.

​याप्रकरणी वन गुन्हा क्रमांक २१/२०२६ (दिनांक १७/०९/२०२६) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला असून, पुढील तपास वागझिराचे वनपाल करत आहेत.

​यांच्या मार्गदर्शनाखाली झाली कारवाई:
सदर धडक कारवाई उप वनसंरक्षक सौरिष सहाय (यावल वन विभाग, जळगाव), विभागीय वनाधिकारी (दक्षता) राजेंद्र सदगीर (धुळे) आणि सहाय्यक वनसंरक्षक समाधान पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गस्ती पथकाचे वनपरिक्षेत्र अधिकारी महेश पाटील, वनपाल संजय पाटील,वनरक्षक सतीश वाघमारे व आय.बी.चव्हाण यांनी केली.

0/Post a Comment/Comments

Advertisement

 


 



जाहिरात