यावल दि.२३
यावल एसटी आगाराकडून लावण्यात आलेल्या एका बॅनरवरून आता राजकीय वादाला तोंड फुटले असून, बॅनरवर जिल्हास्तरापासून दिल्लीपर्यंतच्या विविध लोकप्रतिनिधींची छायाचित्रे असताना महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे छायाचित्र नसल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. त्याच प्रमाणे चोपडा-यावल मतदारसंघाचे विद्यमान आमदार तथा शिवसेना शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत सोनवणे यांचे छायाचित्रही वगळण्यात आल्याने मतदारसंघातील नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
बॅनरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,मंत्री गिरीश महाजन यांच्यासह विविध स्तरांवरील लोकप्रतिनिधींची छायाचित्रे समाविष्ट करण्यात आली.मात्र, महाराष्ट्र राज्य परिवहन विभागाचा कारभार सांभाळणारे राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचेच छायाचित्र बॅनरवर नसल्याने अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.एसटी महामंडळाचा कार्यक्रम किंवा उपक्रम असताना संबंधित विभागाच्या मंत्र्यांचे छायाचित्र का वगळण्यात आले, असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे.
.
त्याचवेळी,चोपडा-यावल मतदारसंघाचे विद्यमान आमदार चंद्रकांत सोनवणे यांचे छायाचित्र न घेता केवळ एका विशिष्ट राजकीय पक्षाच्या आमदाराला बॅनरवर प्राधान्य देण्यात आल्याचा आरोपही राजकीय वर्तुळातून होत आहे.यामुळे “यावल आगार प्रशासनाला फक्त एकाच पक्षाचे प्रतिनिधी, पदाधिकारी व कार्यकर्ते प्रिय आहेत का?” असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित करण्यात येत आहे.
विशेष म्हणजे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत मंत्री गिरीश महाजन यांचे छायाचित्र घेण्यात आले असताना, चोपडा-यावल मतदारसंघाचे विद्यमान आमदार चंद्रकांत सोनवणे यांचे छायाचित्र का वगळण्यात आले.? याचा खुलासा संबंधितांनी करावा, अशी मागणी होत आहे.
यावल तालुक्यातील पूर्व व पश्चिम भागात लोकप्रतिनिधित्व करणाऱ्या दोन्ही बाजूंच्या लोकप्रतिनिधींना समान सन्मान मिळणे अपेक्षित असताना बॅनरवरील निवडक छायाचित्रांमुळे पक्षपातीपणाचा आरोप होऊ लागला आहे. त्यामुळे यावल आगार प्रमुखांनी या संदर्भात जनतेसमोर स्पष्ट भूमिका मांडावी, अशी मागणी जोर धरत आहे.
दरम्यान, यावल नगरपरिषदेच्या लोकनियुक्त नगराध्यक्ष सौ. छायाताई अतुल पाटील यांच्याबाबतही संबंधित कार्यक्रमात प्रोटोकॉलचे पालन झाले का.? असा मुद्दा उपस्थित करण्यात येत आहे. लोकनियुक्त नगराध्यक्षांना प्रोटोकॉलनुसार योग्य सन्मान देण्यात आला नसल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून करण्यात येत आहे.
आता या संपूर्ण प्रकरणावर शिवसेना शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत सोनवणे,शिवसेना ठाकरे गटाचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच यावल आगार प्रशासन नेमकी कोणती भूमिका घेते, याकडे राजकीय वर्तुळासह नागरिकांचे लक्ष लागून आहे.
विशेष म्हणजे, जिल्हास्तरापासून दिल्लीपर्यंतच्या अनेक लोकप्रतिनिधींची छायाचित्रे बॅनरवर असताना महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आणि स्थानिक मतदारसंघाचे विद्यमान आमदार चंद्रकांत सोनवणे यांची छायाचित्रे नेमकी कोणत्या कारणामुळे वगळण्यात आली, याचा तत्काळ खुलासा होणे आवश्यक असल्याची मागणी आता जोर धरत आहे.



टिप्पणी पोस्ट करा