यावल आगारातील लोकार्पण सोहळ्यात नगराध्यक्षांचा प्रोटोकॉल डावलल्याचा आरोप ; माजी नगराध्यक्ष,विद्यमान नगरसेवक अतुल पाटील यांचा कार्यक्रमावर बहिष्कार

यावल दि.२३
यावल आगार येथे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या पाच नवीन अत्याधुनिक बसेसच्या लोकार्पण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. मात्र,या कार्यक्रमात लोकनियुक्त नगराध्यक्ष सौ. छायाताई अतुल पाटील यांच्या प्रोटोकॉल व सन्मानाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक अतुल पाटील यांनी केला आहे.

कार्यक्रमासाठी नगराध्यक्ष सौ. छायाताई पाटील उपस्थित असतानाही त्यांना व्यासपीठावर योग्य सन्मानाचे स्थान न देता बाजूच्या खुर्चीवर बसावे लागले. तसेच कार्यक्रमाच्या सुरुवातीच्या दीपप्रज्वलनाच्या वेळी त्यांचे नाव उशिराने घेण्यात आले. सत्काराच्या वेळीही आवश्यक तो प्रोटोकॉल पाळण्यात आला नसल्याचा आरोप करण्यात आला.

विशेष म्हणजे, नगरपरिषद यावलच्या लोकनियुक्त नगराध्यक्ष या नात्याने सौ. छायाताई पाटील या त्या कार्यक्रमातील प्रमुख लोकप्रतिनिधींपैकी एक असताना त्यांना अपेक्षित सन्मान न मिळाल्याने उपस्थितांमध्येही नाराजी व्यक्त करण्यात आली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व नियोजन करण्याची जबाबदारी प्रामुख्याने आगार प्रशासनाची असताना काही भाजप पदाधिकाऱ्यांनी कार्यक्रमात माईक हातात घेऊन सूत्रसंचालनात हस्तक्षेप केल्याचा आरोपही करण्यात आला. त्यामुळे शासकीय कार्यक्रमाचे स्वरूप बाजूला पडून कार्यक्रमावर राजकीय वर्चस्व प्रस्थापित करण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप करण्यात आला.

या संपूर्ण प्रकारामुळे संतप्त झालेल्या अतुल पाटील यांनी आगार प्रशासन व संबंधित भाजप कार्यकर्त्यांच्या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त केली. लोकनियुक्त नगराध्यक्षांचा सन्मान आणि शासकीय कार्यक्रमातील प्रोटोकॉल पाळला जात नसेल, तर हा संपूर्ण यावल शहराचा अपमान आहे.अशा कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, अशी भूमिका घेत त्यांनी कार्यक्रमावर बहिष्कार टाकला.

“लोकप्रतिनिधींचा सन्मान हा पक्षीय राजकारणापेक्षा मोठा”

शासकीय कार्यक्रम कोणत्याही एका राजकीय पक्षाचा कार्यक्रम नसतो. अशा कार्यक्रमात उपस्थित असलेल्या लोकनियुक्त लोकप्रतिनिधींना त्यांच्या पदानुसार योग्य सन्मान व प्रोटोकॉल मिळणे अपेक्षित असते. यावलच्या लोकनियुक्त नगराध्यक्षांचा अवमान कोणत्याही परिस्थितीत सहन केला जाणार नाही, अशी ठाम भूमिका अतुल पाटील यांनी घेतली.

“राजकारण करायचे असेल तर ते निवडणुकीच्या मैदानात करा; मात्र शासकीय कार्यक्रमात लोकप्रतिनिधींचा प्रोटोकॉल आणि सन्मान पायदळी तुडवून राजकीय शक्तिप्रदर्शन करण्याचा प्रयत्न आम्ही सहन करणार नाही,” अशी संतप्त प्रतिक्रिया अतुल पाटील यांनी व्यक्त केली.

0/Post a Comment/Comments

Advertisement

 


 



जाहिरात