यावल दि.२७
यावल नगरपरिषद हद्दीतील बालाजी सिटी या विस्तारित भागात महाराष्ट्र शासनाच्या निधीतून साकारत असलेल्या 'नमो गार्डन' या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची पाहणी करीत असताना काम आता अंतिम टप्प्यात जात आल्याची माहिती लोकनिक्त अध्यक्षा सौ.छायाताई पाटील यांनी दिली.
या प्रकल्पाच्या कामाची प्रगती आणि गुणवत्तेची पाहणी नगराध्यक्षा सौ.छायाताई पाटील यांच्यासह संबंधित अधिकारी आणि त्यांच्या गटातील नगरसेवकांनी केली.
प्रकल्पाची पार्श्वभूमी आणि उद्देश -- यावल शहराचा झपाट्याने विस्तार होत असून वाढत्या नागरीकरणामुळे नागरिकांसाठी विरंगुळा केंद्राची नितांत गरज होती.ही गरज ओळखून महाराष्ट्र शासनाकडून यावल नगरपरिषदेला 'नमो गार्डन' उभारणीसाठी १ कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे.या निधीतून हे उद्यान केवळ मनोरंजनाचे केंद्र न राहता, शहराच्या सौंदर्यात भर घालणारा,पर्यावरणपूरक आणि सांस्कृतिकदृष्ट्या महत्त्वाचा बहुउद्देशीय प्रकल्प म्हणून विकसित केला जात आहे.
प्रकल्पाची सविस्तर वैशिष्ट्ये:
या उद्यानात नागरिकांच्या काही सुविधांचा,गरजांचा विचार करण्यात आला आहे.
अ ) सांस्कृतिक विभाग - अँफिथिएटर: उद्यानात १५० प्रेक्षक बसू शकतील अशी गॅलरी असलेले सुसज्ज खुले नाट्यगृह बांधण्यात आले आहे. यामुळे शहरातील सांस्कृतिक कार्यक्रम, शालेय बालनाट्य, व्याख्याने व इतर सार्वजनिक उपक्रमांसाठी एक कायमस्वरूपी व्यासपीठ उपलब्ध होणार आहे.
ब ) पर्यावरण व शिक्षण विभाग - वनौषधी बँक: या विभागात सातपुडा पर्वतरांगेत नैसर्गिकरित्या आढळणाऱ्या दुर्मिळ वनौषधी,औषधी वनस्पती, विविध प्रजातींची फळझाडे आणि सावली देणाऱ्या वृक्षांची शास्त्रोक्त पद्धतीने लागवड करण्यात येत आहे. यामुळे नागरिकांमध्ये विशेषत त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये वनस्पतीशास्त्राबद्दल आवड निर्माण होईल.
क) तंत्रज्ञान विभाग - स्मार्ट व्यवस्थापन: सदर उद्यान हे स्मार्ट गार्डन म्हणून विकसित केले जात आहे. ऊर्जेची बचत व्हावी म्हणून १० ठिकाणी सौर ऊर्जेवर चालणारे मोठे दिवे ( सोलर लाईट ) बसवण्यात आले आहेत. तसेच पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी संपूर्ण लॉन आणि झाडांसाठी स्वयंचलित ठिबक सिंचन प्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे.
ड ) कृषी गौरव विभाग - शेतकरी शिल्प: यावल तालुका हा केळी उत्पादनासाठी संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. या केळी उत्पादक शेतकऱ्याच्या योगदानाचा गौरव म्हणून उद्यानाच्या मध्यवर्ती ठिकाणी 'केळी उत्पादक शेतकरी दांपत्य' आणि केळी घडाचे आकर्षक शिल्प उभारण्यात येत आहे. हे शिल्प यावलच्या कृषी संस्कृतीचे प्रतीक ठरेल.
प्रशासनाची भूमिका:
पाहणीदरम्यान नगराध्यक्षा सौ. पाटील यांनी कामाच्या गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड सहन केली जाणार नाही असे स्पष्ट निर्देश कंत्राटदाराला दिले. या प्रकल्पावर नगरपरिषदेचे अभियंता संग्राम खडके हे स्वतः देखरेख अधिकारी म्हणून काम पाहत असून ते दररोज कामाच्या प्रगतीचा अहवाल घेत आहेत.
जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत घेण्यात येणाऱ्या 'सर्वोत्कृष्ट नमो गार्डन' या जिल्हास्तरीय स्पर्धेत यावल नगरपरिषदेचे हे उद्यान प्रथम क्रमांक पटकावेल असा ठाम विश्वास यावेळी नगराध्यक्षा व सर्व पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
या पाहणी दौऱ्याप्रसंगी माजी नगराध्यक्ष अतुल पाटील, पराग सराफ, निसार मोमिन, हकीम शेठ, करीम मन्यार, पिंटू सेठ, समीर मेंबर, उमर कच्ची, मजहर मेंबर यांच्यासह बालाजी सिटी परिसरातील प्रतिष्ठित नागरिक व मोठ्या संख्येने स्थानिक रहिवासी उपस्थित होते.



टिप्पणी पोस्ट करा