नियमित हप्ता भरूनही कर्ज खाते ‘एनपीए’ करण्याचा प्रकार ? ठरलेल्या रकमेपेक्षा जास्त आणि वेळेआधी भरणा ; कोणतीही लेखी नोटीस नसताना कारवाई केल्यास सहकारी बँकेला बसू शकतो फटका.

यावल दि.२५ 
एका सहकारी बँकेतील कर्जदाराने आपल्या कर्जाच्या मासिक हप्त्यांमध्ये एकदाही आर्थिक चूक अथवा थकबाकी केलेली नसताना, उलट निश्चित केलेल्या मासिक हप्त्यापेक्षा अधिक रक्कम नियमितपणे आणि वेळेपूर्वी भरलेली असतानाही संबंधित कर्ज खाते अचानक एनपीए (Non-Performing Asset) म्हणून वर्गीकृत करण्यात आल्याचा गंभीर प्रकार समोर येण्याची शक्यता आहे.

विशेष म्हणजे, या संदर्भात कर्जदाराला कोणतीही स्पष्ट व लेखी पूर्वसूचना देण्यात आली नसल्याचा आरोप करण्यात येत आहे.

या प्रकारामुळे संबंधित सहकारी बँकेच्या कर्जवसुली प्रक्रियेवर, लेखापरीक्षणावर आणि अंतर्गत नियंत्रण व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
नियमित कर्जदाराला एनपीए कसे ?

कर्ज खाते एनपीए ठरविण्यासाठी संबंधित बँकेने लागू असलेल्या नियामक निकषांचे तसेच कर्ज करारातील अटींचे पालन करणे आवश्यक असते.सर्वसाधारणपणे केवळ एखाद्या अधिकाऱ्याच्या इच्छेनुसार किंवा तोंडी निर्णयावर कर्ज खाते एनपीए करता येत नाही.

कर्जदाराने—
ठरलेले मासिक हप्ते नियमित भरले असतील,कोणताही हप्ता थकीत नसेल,निर्धारित रकमेपेक्षा जास्त रक्कम भरलेली असेल,
भरणा वेळेपूर्वी झालेला असेल,
आणि बँकेच्या नोंदीत प्रत्यक्ष थकबाकी दिसत नसेल,तर अशा परिस्थितीत खाते एनपीए ठरविण्यापूर्वी संबंधित व्यवहारांची सखोल पडताळणी होणे अत्यंत आवश्यक आहे.
भरणा असूनही खाते थकीत दाखविले तर जबाबदारी कोणाची ?

कर्जदाराने रक्कम भरल्यानंतरही ती योग्य कर्ज खात्यात जमा न होणे,चुकीच्या पद्धतीने व्याज आकारणी होणे,परतफेडीच्या नोंदीमध्ये तांत्रिक किंवा मानवी चूक होणे अथवा लेखापद्धतीतील त्रुटीमुळे खाते चुकीच्या वर्गवारीत जाणे, ही बँकेच्या अंतर्गत व्यवस्थेतील गंभीर बाब ठरू शकते.

जर कर्जदाराकडे हप्ते भरल्याच्या पावत्या,बँक स्टेटमेंट, ऑनलाइन व्यवहारांचे पुरावे अथवा पासबुक नोंदी उपलब्ध असतील आणि तरीही त्याचे खाते थकीत अथवा एनपीए दाखविण्यात आले असेल, तर संबंधित बँकेने याबाबत स्पष्ट खुलासा करणे आवश्यक ठरते.
लेखी सूचना न दिल्याचा आरोप
कर्जदाराचे म्हणणे असेल की, बँकेकडून खाते थकीत असल्याबाबत किंवा एनपीए वर्गवारीबाबत कोणतीही लेखी माहिती,खाते तपशील अथवा स्पष्ट कारणपत्र देण्यात आले नाही,तर हा मुद्दा अधिक गंभीर ठरू शकतो.कारण अशा आर्थिक व्यवहारात पारदर्शकता राखणे,ग्राहकाला खाते स्थितीची माहिती देणे आणि आवश्यक असल्यास त्रुटी दुरुस्तीसाठी संधी उपलब्ध करून देणे,ही सुयोग्य बँकिंग पद्धतीचा महत्त्वाचा भाग मानला जातो.

सहकारी बँकेच्या व्यवस्थापनासमोर प्रश्नांची मालिका या प्रकरणात आता काही महत्त्वाचे प्रश्न उपस्थित होत आहेत --

कर्जदाराने नेमका कोणता हप्ता भरलेला नाही? खाते थकीत असल्यास त्याची दिनांकवार माहिती कर्जदाराला का देण्यात आली नाही? कर्जदाराने भरलेली जादा रक्कम कोणत्या खात्यात जमा करण्यात आली ? खाते एनपीए करण्याचा निर्णय कोणत्या नोंदी आणि निकषांच्या आधारे घेण्यात आला ? खाते वर्गीकरणापूर्वी कर्जदाराच्या संपूर्ण व्यवहाराची पडताळणी झाली का ? बँकेच्या अंतर्गत लेखा व कर्ज विभागातील चुकीमुळे कर्जदाराला आर्थिक व मानसिक त्रास तर झाला नाही ना ? या सर्व प्रश्नांची उत्तरे बँकेच्या नोंदीतूनच स्पष्ट होणे आवश्यक आहे. चुकीच्या एनपीए वर्गीकरणाचे गंभीर परिणाम एखाद्या नियमित कर्जदाराचे खाते चुकीच्या पद्धतीने एनपीए दाखविल्यास त्याचा परिणाम कर्जदाराच्या आर्थिक प्रतिष्ठेवर होऊ शकतो. भविष्यातील कर्ज व्यवहार, पतमूल्यांकन तसेच बँकिंग व्यवहारांवर त्याचे परिणाम होण्याची शक्यता असते.
त्यामुळे कोणतेही खाते एनपीए वर्गवारीत टाकताना संबंधित बँकेने अत्यंत काळजीपूर्वक आणि नियमबद्ध पद्धतीने प्रक्रिया करणे अपेक्षित आहे.

चुकीच्या नोंदीमुळे कर्जदाराचे नुकसान झाल्यास संबंधित कर्जदाराकडून योग्य त्या पातळीवर तक्रार,लेखी हरकत तसेच संबंधित सहकारी व बँकिंग प्राधिकरणाकडे दाद मागण्याची प्रक्रिया सुरू होऊ शकते. 

“शहाणपणा”  बँकेच्या अंगलट येण्याची शक्यता ---
नियमितपणे हप्ते भरणाऱ्या आणि ठरलेल्या रकमेपेक्षाही अधिक रक्कम वेळेआधी जमा करणाऱ्या ग्राहकाचे खाते कोणतीही स्पष्ट पडताळणी न करता एनपीए ठरविण्यात आले असेल,तर हा निर्णय संबंधित सहकारी बँकेच्या अंगलट येण्याची शक्यता नाकारता येत नाही.

कारण या प्रकरणात कर्जदाराकडे सर्व व्यवहारांचे लेखी व डिजिटल पुरावे उपलब्ध असल्यास बँकेच्या संबंधित अधिकारी व व्यवस्थापनाला आपल्या निर्णयाचे स्पष्टीकरण द्यावे लागू शकते.निष्पक्ष चौकशीची गरज या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्षपणे चौकशी करून कर्जदाराच्या खात्याचे संपूर्ण कर्ज खाते विवरणपत्र, हप्ता निहाय नोंदी,व्याज आकारणी,जमा झालेल्या रकमा आणि खाते एनपीए करण्या मागील कारणे तपासणे आवश्यक आहे.जर चौकशीत कर्जदाराची कोणतीही चूक नसल्याचे निष्पन्न झाले,तर खाते तत्काळ योग्य वर्गवारीत आणून चुकीच्या नोंदीची दुरुस्ती करण्यात यावी,अशी मागणी होण्याची शक्यता आहे.
“नियमित कर्जदारावर अन्याय होणार नाही आणि बँकिंग व्यवहारातील पारदर्शकता कायम राहील,याची जबाबदारी संबंधित सहकारी बँकेच्या व्यवस्थापनावर आहे,”अशी चर्चा आता या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर सुरू झाली आहे.

टीप : या बातमीत संबंधित कर्जदार व बँकेचे नाव नमूद करण्यात आलेले नाही.अधिकृत कागदपत्रे,खाते विवरणपत्र संबंधित नियमांच्या आधारे प्रकरणाची तथ्यपडताळणी झाल्यानंतर पुढील बाबी स्पष्ट होऊ शकतात.

0/Post a Comment/Comments

Advertisement

 


 



जाहिरात