पोदार इंटरनॅशनल स्कूल, अकलूद येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी.



यावल दि.२० 
तालुक्यातील अकलूद येथील पोदार इंटरनॅशनल स्कूल येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती मोठ्या उत्साहात,अभिमानाने साजरी करण्यात आली.

कार्यक्रमाची सुरुवात प्राचार्य सचिन बनसोडे सर यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून करण्यात आली.यावेळी स्कूल मधील सर्व शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.त्यानंतर श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचा गौरव करणारी प्रार्थना गीते सादर करण्यात आली.

कार्यक्रमात इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांनी ऐतिहासिक नाट्यप्रयोग सादर करून उपस्थितांची मने जिंकली. नाटकामध्ये श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म प्रसंग अत्यंत लक्षवेधी, प्रभावीपणे सादर करण्यात आला.तसेच तारकेश्वर मंदिरात घेतलेली स्वराज्य शपथ आणि अफझलखान वधाचा प्रसंग विद्यार्थ्यांनी प्रभावी संवादफेक व अभिनयातून सादर केला.या सादरीकरणातून शिवाजी महाराजांचे शौर्य,धैर्य आणि दूरदृष्टी यांचे जिवंत चित्रण अनुभवायला मिळाले.

इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांनी शिवाजी महाराजांवरील गीतावर आकर्षक नृत्य सादर करून वातावरण भारावून टाकले. त्यांच्या सादरीकरणातून राष्ट्रप्रेम आणि शिवभक्तीची भावना स्पष्टपणे व्यक्त झाली. तसेच इयत्ता सहावीतील विद्यार्थिनी स्वरा नाझीरकर हिने “शिवगर्जना” सादर करून संपूर्ण वातावरणात उत्साहाची, प्रेरणादायी लहर निर्माण केली.

संपूर्ण कार्यक्रमात शिस्त,उत्साह आणि ऐतिहासिक अभिमान यांचा सुंदर संगम पाहायला मिळाला.

प्राचार्यांचे मनोगत -- 
यावेळी प्राचार्य सचिन बनसोडे सर यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, “छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ एक महान योद्धा नव्हते, तर ते आदर्श नेतृत्व, दूरदृष्टी, न्यायप्रियता आणि राष्ट्रनिष्ठेचे प्रतीक होते.त्यांच्या जीवनातून आपल्याला धैर्य, स्वाभिमान आणि कर्तव्यनिष्ठा यांचे मौल्यवान धडे मिळतात. विद्यार्थ्यांनी शिवाजी महाराजांच्या विचारांचे अनुकरण करून आपल्या जीवनात शिस्त,
प्रामाणिकपणा आणि देशप्रेम जोपासावे.अशा कार्यक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये इतिहासाबद्दल अभिमान निर्माण होतो आणि त्यांना प्रेरणा मिळते.”

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले. या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये इतिहासाबद्दल जागरूकता आणि राष्ट्राभिमान अधिक दृढ झाल्याचे पाहायला मिळाले. 

0/Post a Comment/Comments

Advertisement

 


 



जाहिरात