यावल दि.२०
स्पर्धा परीक्षा म्हणजे केवळ नोकरी मिळवण्याचे साधन नसून, ती विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासाची, निर्णयक्षमता वाढवण्याची तसेच गुणवत्ता व कौशल्य वृद्धिंगत करण्याची प्रभावी प्रक्रिया आहे. परीक्षांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना स्वतःची क्षमता ओळखण्याची तसेच सातत्याने आत्मपरीक्षण करून सुधारणा करण्याची संधी मिळते, असे प्रतिपादन प्रा. डॉ. संदीप धापसे यांनी केले.
अंतर्नाद प्रतिष्ठानतर्फे दि. १९ रोजी सौ. कमलाबाई अग्रवाल गर्ल्स हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, रावेर येथे माजी खासदार तथा आमदार, कृषीमित्र स्व. हरिभाऊ जावळे व स्व. पुष्पा वसंतराव पाटील यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित ‘पुष्पांजली प्रबोधनमाला’ कार्यक्रमातील द्वितीय पुष्प श्री. व्ही. एस. नाईक कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. डॉ. संदीप धापसे यांनी गुंफले. ‘स्पर्धा परीक्षा व करिअर मार्गदर्शन’ या विषयावर ते मार्गदर्शन करत होते. यंदा या प्रबोधनमालेचे आठवे वर्ष आहे. विचार मंचावर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य नीलम पुराणिक, प्रकल्प प्रमुख ज्ञानेश्वर घुले, समन्वयक चंद्रकांत सूर्यवंशी, सहसमन्वयक ललित महाजन उपस्थित होते.
परीक्षा ही विद्यार्थ्यांच्या ज्ञान, कौशल्य, समज आणि पात्रतेची औपचारिक चाचणी असून शालेय, महाविद्यालयीन, प्रवेश तसेच स्पर्धा परीक्षा या सर्वांचा विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासात अत्यंत महत्त्वाचा वाटा आहे, असे प्रा. डॉ. संदीप धापसे यांनी स्पष्ट केले. करिअर या संकल्पनेवर मार्गदर्शन करताना त्यांनी दीर्घकालीन नियोजन, सातत्यपूर्ण मेहनत आणि योग्य दिशेचे महत्त्व अधोरेखित केले. योग्य वेळी मिळणारे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना जीवनातील योग्य निर्णय घेण्यास तसेच उद्दिष्टे साध्य करण्यासाठी आवश्यक आत्मविश्वास प्रदान करते. जे स्वप्न पाहू शकत नाही, ते आयुष्य घडवू शकत नाही. म्हणून विद्यार्थ्यांनी उघड्या डोळ्यांनी मोठी स्वप्ने पाहावीत, असा प्रेरणादायी संदेशही त्यांनी यावेळी दिला.
प्रबोधनमालेसाठी रावेर विधानसभेचे आमदार तथा भाजपा जिल्हाध्यक्ष अमोल जावळे, दीपस्तंभ फाउंडेशनचे यजुर्वेंद्र महाजन आणि जळगावचे उद्योजक अजय बढे यांचे मार्गदर्शन लाभले. सूत्रसंचालन प्रा.पंकज पाटील यांनी केले तर आभार प्रा. नितीन खारे यांनी मानले. यावेळी अंतर्नाद प्रतिष्ठानचे सदस्य पवन चौधरी, वरूण महाजन, अंतर्नादचे अध्यक्ष संदीप पाटील इत्यादी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नियोजन समिती सदस्यांनी परिश्रम घेतले.



टिप्पणी पोस्ट करा