यावल दि.२२
“स्पर्धा परीक्षेत यश मिळवायचे असेल तर सुरुवातीलाच अवघड वाटणाऱ्या विषयाचा अभ्यास करणे आवश्यक आहे. मागील प्रश्नपत्रिकांचे सखोल विश्लेषण केल्यास परीक्षेचा नेमका अंदाज येतो. १०वी व १२वी नंतर कोणत्याही क्षेत्रात प्रवेशासाठी स्पर्धा परीक्षा द्यावीच लागते, त्यामुळे स्पर्धेला सामोरे जाण्याची मानसिक तयारी ठेवावी लागते. आपण किती प्रामाणिक प्रयत्न आणि मेहनत करतो, यावरच पुढील आयुष्याची दिशा आणि दर्जा ठरत असतो. प्रत्येकाने स्वतःच्या क्षमतेनुसार अभ्यासाचे तास निश्चित करावेत, कारण वरवरचा अभ्यास करून स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होता येत नाही”,असे प्रतिपादन बबनराव काकडे यांनी केले.
अंतर्नाद प्रतिष्ठानतर्फे दि. २१ रोजी भारत विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, न्हावी ता. यावल येथे माजी खासदार तथा आमदार, कृषीमित्र स्व. हरिभाऊ जावळे व स्व. पुष्पा वसंतराव पाटील यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित ‘पुष्पांजली प्रबोधनमाला’ कार्यक्रमातील तृतीय पुष्प प्रांताधिकारी बबनराव काकडे यांनी गुंफले. ‘स्पर्धा परीक्षा व व्यक्तिमत्व विकास’ या विषयावर ते मार्गदर्शन करत होते. यंदा या प्रबोधनमालेचे आठवे वर्ष आहे. विचार मंचावर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष शरद महाजन, मुख्यध्यापक विजय वारके, उपमुख्यध्यापक संगीता फिरके, समन्वयक चंद्रकांत सूर्यवंशी, सहसमन्वयक ललित महाजन उपस्थित होते.
अभ्यास करताना तसेच परीक्षेत प्रश्न पत्रिका सोडवतांना वेळेचे योग्य नियोजन करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. उत्तरपत्रिकेत निटनेटकेपणा, स्पष्ट मांडणी आणि योग्य भाषा-शैली याकडे विशेष लक्ष दिले पाहिजे. व्यक्तिमत्त्व विकासासाठी अवांतर वाचनाची सवय लावणे गरजेचे असून, जितके अधिक वाचन तितकी वैचारिक समृद्धी वाढते. केवळ बुद्धिमत्तेपेक्षा सातत्य, चिकाटी आणि बुद्धिमत्तेचा योग्य वापर अधिक महत्त्वाचा ठरतो. सातत्याने केलेला अभ्यास आणि प्रयत्नच खरे यश मिळवून देतात, असा सल्ला बबनराव काकडे यांनी यावेळी विद्यार्थ्यांना दिला.
ज्या क्षेत्रात करिअर कराल, त्या क्षेत्रात सर्वोत्तम काम करण्याचा ध्यास ठेवा, कारण प्रत्येक क्षेत्रात उत्कृष्ट होण्याचा मार्ग कायमच खुला असतो. मनापासून काम करा आणि एक जबाबदार व संवेदनशील नागरिक होण्याचा प्रयत्न करा. अपेक्षित यश मिळाले नाही तरी पर्यायी ‘प्लॅन बी’ तयार ठेवणे आवश्यक आहे. प्रत्येक दिवस ही एक नवी सुरुवात असून अपयश आले तरी त्यातून शिकून नव्या जोमाने पुढे वाटचाल करावी. एखादा छंद जोपासल्यास जीवन अधिक आनंदी आणि समृद्ध होते. कितीही संघर्ष आला तरी न डगमगता त्याला सामोरे जाणे, हीच यशस्वी आयुष्याची खरी ओळख आहे, असा गुरुमंत्रही बबनराव काकडे यांनी विद्यार्थ्यांना दिला.
प्रबोधनमालेसाठी रावेर विधानसभेचे आमदार अमोल जावळे, दीपस्तंभ फाउंडेशनचे यजुर्वेंद्र महाजन आणि जळगावचे उद्योजक अजय बढे यांचे मार्गदर्शन लाभले. सूत्रसंचालन ललित सुपे यांनी केले तर आभार जयंत चौधरी यांनी मानले. यावेळी अंतर्नाद प्रतिष्ठानचे अध्यक्ष संदीप पाटील, आणि भारत विद्यालयाचे सर्व शिक्षक वृंद उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नियोजन समिती सदस्यांनी परिश्रम घेतले.



टिप्पणी पोस्ट करा