यावल दि.२९
तालुक्यातील साकळी गावात आणि परिसरात वीज वितरण कंपनीकडून जबरदस्तीने स्मार्ट मीटर बसविण्याचा अवैध आणि आक्रमक प्रयत्न सुरू असून यामुळे नागरिकांमध्ये अक्षरशः संतापाची लाट उसळली आहे. महाराष्ट्र शासनाने कोणत्याही नागरिकांना ‘स्मार्ट मीटर बदलणे बंधनकारक’ अशा प्रकारचे कोणतेही आदेश दिले नसताना, स्थानिक वीज वितरण विभाग मात्र पोलिसांचा धाक दाखवत जबरदस्तीची थेट कारवाई करत असल्याचा गंभीर आरोप नागरिकांनी केला आहे.
शहरातील विविध भागांत वीज विभागाचे पथक अचानक धडक मारत घरांच्या दारात येऊन “स्मार्ट मीटर बसवावेच लागेल” असा दबाव टाकत आहे. या कारवाईदरम्यान नागरिकांचे म्हणणे न ऐकता, कोणतेही लिखित आदेश न दाखवता, ‘पोलिस बोलवू’, ‘कारवाई करू’ अशा धमक्या दिल्या जात असल्याचे अनेकांनी सांगितले.
नागरिक आक्रोसले – “हे शासनाचे आदेश नाहीत, मग कोणाच्या इशाऱ्यावर चालली ही गुंडागिरी?”
वीज वितरण विभागाचा हा ‘एकतर्फी आणि मनमानी कारभार’ थांबवावा, तसेच स्मार्ट मीटरची सक्ती करू नये, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून जिल्हा प्रशासनाकडे करण्यात आली आहे.
स्थानिक नागरिकांचे स्पष्ट मत आहे की –
स्मार्ट मीटरमुळे दर वाढतील,
बिलिंगमध्ये गोंधळ व अचानक वाढ होतील,
मीटरचे नियंत्रण पूर्णपणे कंपनीकडे जाईल,
आणि सामान्य नागरिकांना आर्थिक फटका बसेल.
तरीही एवढ्या सर्व शंका आणि विरोध असतानाही वीज वितरण विभागाने नागरिकांच्या भावना व भीतीचा विचार न करता थेट दडपशाहीचा मार्ग अवलंबल्याने परिस्थिती अधिकच तणावपूर्ण बनली आहे.
“साकळीत लोकशाही नाही, स्मार्ट मीटरशाही लागू केली जातेय का?” असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे.
प्रशासनाने त्वरित हस्तक्षेप करून वीज वितरण विभागाच्या मनमानीवर आळा घालावा, जबरदस्तीने होणारे स्मार्ट मीटर बसविणे तातडीने थांबवावे, अशी संतप्त मागणी आज सर्वसामान्य नागरिकांकडून मोठ्या प्रमाणावर होत आहे.
साकळी गावात या कारभाराविरोधात तीव्र असंतोष उसळलेला असून परिस्थिती गंभीर बनत चालली आहे.



टिप्पणी पोस्ट करा