यावल दि.२१
यावल तालुक्यातील मधुकर
सहकारी साखर कारखाना तथाकथित पद्धतीने खरेदी करून साखर कारखाना थाटात सुरु करण्याच्या केवळ घोषणा करून शेतकऱ्यांना सापत्न वागणूक देणाऱ्या पुणे स्थित इंडिया बायो पसिफिक कंपनीने /शेतकऱ्यांचे बेण्याचे ४ महिन्यांपासून अडकवून ठेवलेले पैसे त्वरित देण्याची मागणी शेतकऱ्यांनी करून साखर कारखाना केव्हा सुरू होणार याकडे सर्वांचे लक्ष वेधून आहे.
पुढील वर्षी कारखाना सुरु करण्यासाठी शेतकऱ्यांना ऊस लागवड करायला लावून आम्ही शेतकऱ्यांना एकरी ४००० रुपये १२% व्याजदराने वसुलपात्र रक्कम देण्याचे कबुल करून कंपनीने ४ महिन्यांपासून शेतकऱ्यांचे बेण्याचे पैसे अडकवून ठेवलेले आहेत.त्यामुळे बेणे पुरवठादार शेतकरी मेटाकुटीस आलेले आहेत व शेतकऱ्यांमध्ये आपसातील संबंधही तणावाचे होत आहेत.
मागील हंगामातही शेतकऱ्यांना ऊस लागवड करायला लावून ऐन वेळी कारखाना सुरु न केल्याने शेतकऱ्यांना आपला ऊस इतरत्र स्वता तोड करून आर्थिक नुकसान सहन करून पाठवावा लागला,ह्या उसाची वाहतूक करण्यास शेतकऱ्यांनी कारखान्यातील पडून असलेल्या जुगाडांची ( बैल गाड्यांची ) मोफत सोडा भाड्याने देण्याची मागणी करूनही साधे जुगाड भाड्याने देण्याचेही सौजन्य ह्या कंपनीने शेतकऱ्यांसाठी या हंगामात दाखवले नाही.यावरून शेतकऱ्यां प्रती असलेली ह्या कंपनीची आस्था कशी आहे ती दिसून येते.ह्या हंगामातही केवळ कारखाना सुरु करण्याची घोषणा करून गाळप सुरु करण्यासाठी साधा गाळप परवाना अर्जही ह्या कंपनीने केला नव्हता. कारखान्यात वर्षातून दोनदा केवळ पर्यटनासाठी येणाऱ्या मालकाकडून कारखाना सुरु करण्याची अपेक्षा कशी ठेवावी.?
आता या हंगामातही शेतकऱ्यांना ऊस लागवड करण्यासाठी मागील दिवाळीपासून स्थानिक कर्मचाऱ्यांना रोजगाराचे आमिष दाखवून कार्यक्षेत्रात ऊस लागवड करायला लावली व ज्या कर्मचाऱ्यांनी रात्रं-दिवस फिरून प्रसंगी अडचणींना तोंड देऊन शेतकऱ्यांना ऊस लागवड करायला लावली त्यांचे ६-६ महिने पगार न देता राबवून आता ह्याच स्थानिक कर्मचाऱ्यांना काम झाल्यावर या इंडिया बायो पसिफिक कंपनीने रात्रीतून घरचा रस्ता दाखवलेला आहे.ज्या कर्मचाऱ्यांच्या संबंधांवर शेतकऱ्यांना ऊस लागवड करायला लावली त्या कर्मचाऱ्यांनाही जर हि कंपनी अशी वागणूक देत असेल तर भविष्यात शेतकऱ्यांना ही कंपनी कशी वागणूक देईल. .?
वरील सर्व बाबी ह्या इंडिया बायो पसिफिक कंपनीची शेतकरी व कर्मचाऱ्याप्रती त्यांची अनास्था दाखवत असून ह्या कंपनीने आपले हुकुमशाही वागणे बंद करून त्वरित सर्व शेतकऱ्यांचे बेण्याचे पैसे तत्काळ अदा करून शेती खात्यातील बंद केलेल्या कर्मचाऱ्यांनाही त्वरित कामावर हजर करून वेळेवर पगार करावे असे समस्त ऊस उत्पादक शेतकरी सभासद नागरिकांनी एक मुखी मागणी केली आहे.



टिप्पणी पोस्ट करा